जळगावचे ‘कलेक्टर’ किती सहजतेने आपल्या पदाची उंची लोकांच्या हृदयात उंचावतात…
एक छोटासा किस्सा..
शहरातील पंचमुखी हनुमान परिसर विकास गणेश मंडळाने या गणेशोत्सवात अगदी सादगीपूर्ण आरासह परिसर स्वच्छ व सुंदर, सुविधायुक्त करण्याचा प्रयत्न केला. कार्यकर्त्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून सायंकाळच्या आरतीसाठी मा. जिल्हाधिकारी श्री. किशोर राजे निंबाळकर साहेब व मंडळाला मदत करणार्या पाहुण्यांनाही आमंत्रित केले होते.
मा. जिल्हाधिकार्यांच्या हस्ते आरती सुरु झाली होती, आरतीचे प्रथम चरण संपण्याच्या आधीच आरतीचा ताट त्यांनी दुसर्याकडे दिला व नंतर सर्वांनी साहेबांचे अनुकरण केल्याने अनेकांना आरतीचा लाभ मिळाला.
आरती नंतर आयोजकांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष व जिल्हाधिकारी म्हणून साहेबांना बैठक व्यवस्थेच्या मध्यभागी व इतर सर्व पाहुण्यांनाही बसण्याची विनंती केली. सर्वजण आसनावर विराजमान झाल्यावर निदर्शनास आले, की बैठक व्यवस्थेच्या मध्यभागी दुसराच पाहुणा बसलेला होता व जिल्हाधिकारी साहेब त्याच्या बाजुला बसले होते.
जो मध्यभागी बसला होता, त्याला आयोजकांनी आपल्या नवीन उपक्रमाविषयी प्रथम मनोगत व्यक्त करण्यासाठी आमंत्रित केले. सुरुवातीला तो नाही म्हणत होता. मात्र स्टेजवर जे काही वेगले घडले ते व्यक्त करायला उभे राहिला. त्याने श्रीगणरायाला वंदन करुन सांगितले, की “गण पती बाप्पा मुले या गणेशोत्सवात नवा विचार अंमलात आणायची संधी मला मिळाली व आज मा. जिल्हाधिकारी साहेबांच्या सोबत बसण्याचं सौभाग्य प्राप्त झालं…. आपणाला वाटलं असेल, की मध्यभागी जिल्हाधिकारी साहेबांच्या ऐवजी मी चुकून बसलो असेल. मात्र तसं नसून मला स्वत: त्यांनीच सांगितले, की तुम्ही वयाने जेष्ठ आहात व आजच्या या कार्यक्रमासंदर्भात तुमचं कामही जास्त आहे. म्हणून तुम्हीच मध्यभागी बसा.”
मला तिथे बसतांना संकोच होत होता. मात्र जिल्हाधिकारी साहेबांनी हाताला धरुन बसविल्यामुळे माझा नाईलाज झाला.” हे बोलत असतांना त्यांचा गळा भरुन आलेला होता.
आता उमगलं की मोठी माणसे कोण असतात? ती मोठी कशी होतात? ते कसं वागतात? तो भावनेच्या भरात बोलत होता…
.
मात्र असे असते मोठेपणाचे लक्षण, अशी असतात मोठ्या पदासोबत मोठ्या मनाची माणसे. जे अगदी सहजतेने मनाचा मोठेपणा दाखवून एका सर्वसामान्य व्यक्तीला मोठेपण देतात. त्याच्या कार्याचा गौरव अनोख्या पद्धतीने करतात.
मा.जिल्हाधिकार्यांची ही छोटीशी कृती उपस्थित सर्वांच्या हृदयात व हृदयाची स्पंदने वाढलेल्या त्या व्यक्तीच्याही हृदयात मोठी जागा करुन गेली. दुसर्याला मोठेपणा देण्यातच खरा मोठेपणा असतो हे त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले.
खरंच आपण जळगावकर खूप नशिवान आहोत, की आपल्याला श्री. किशोर राजे निंबाळकर साहेबांसारखे जिल्हाधिकारी लाभलेले आहेत. त्यांच्याविषयी मला विचाराल तर, ‘विधायक कामास संमती + मदत करणारे बॉस’ असेच मी म्हणेल.
– आनंद मल्हारा


