Kaun kahta hai vo bah gaya..vo to Shahid ho Gaya

Kaun kahta hai vo bah gaya..vo to Shahid ho Gaya

  • 146 Views

कोण म्हणतं, तो पुरात वाहून गेला?
नव्हे तो इतरांना वाचवून वीरगतीला प्राप्त झाला..!

दि. १६ ऑगस्ट २०१८ रोजी जळगावात यावर्षीचा पहिला जोरदार पाऊस झाला. त्यामुळे अयोध्या नगर भागातील नाल्याला प्रचंड पूर आल्याने अयोध्या नगर व लक्ष्मीनगरला जोडणा-या पुलावरुन पाणी वाहत होते. हेमंत वाणी हा ३५ वर्षांचा तरुण सायंकाळी कामावरुन आपल्या घरी जात असतांना पुलाजवळ आला. त्यावेळी पुरामुळे पुलाच्या दोन्ही बाजुला लोक उभी होती. त्यांच्या मदतीसाठी दोन-तीन तरुण सरसावले. त्यात हेमंतनेही पुढाकार घेतला. अनेकांना त्याने पूल सुरक्षितरीत्या ओलांडण्यासाठी मदत केली. शाळेकरी मुले होती त्यांना खाद्यांवर घेत तर वयोवृद्धांचा हात पकडून त्यांना पूल पार करण्यासाठी त्याने सहकार्य केले. हे करीत असतांना तो थोडा दमला म्हणून घरी जाऊन थोडे खाऊन पुन्हा तो पुलाजवळ आला. तोपर्यंतही पुलावरील पाणी काही कमी झालेले नव्हते. त्यावेळी त्याने तिथे पाहिले, की एक गाय नाल्यात अडकली होती. हे बघुन मूळात संवेदनशील असणा-या हेमंतच्या हृदयाला पाझर फुटला. तिला काहीही करुन वाचवायचेच, असा निश्चिय त्याने केला आणि शर्तीचे प्रयत्न करुन त्या गायीला बाहेर काढले.

मात्र नियतीच्या मनात वेगळेच काहीतरी होते. मदतकार्य करीत असतांना त्याचा पाय घसरुन तो पाण्यात पडला. पुराचा प्रवाह इतका वेगवान होता, की क्षणार्धात तो वाहत गेला. बघणारे लोक काही करण्याआधीच तो त्यांच्या दृष्टीआड झालेला होता. हेमंतचा शोध घेण्यासाठी खूप प्रयत्न झाले. शासकीय यंत्रणाही कामाला लागलेली होती. मात्र त्याचा कुठेच पत्ता लागला नाही.

अपघाताच्या दुस-या दिवशी मी त्याच्या घरी गेलो होतो. त्याचा भाऊ प्रमोद वाणी हा माझ्या कंपनीत कामाला असून एक विश्वासू आणि मेहनती व्यक्ती म्हणून त्याचा लौकिक आहे. त्याच्याकडून व तिथे जमलेले सर्व नातेवाईक, प्रेमी मंडळींनीकडून ही सर्व परिस्थिती समजली. घरातील कमविता तरुण मुलगा गेल्याने आई-वडील सुन्न झालेले होते. हेमंत आता आपल्यात परत येणार नाही, हे सत्य सर्वांनी स्विकारले होतेच. मात्र त्याचे पार्थिव कुठे, कसे असेल? या प्रश्नाने सर्वजण काळजीत होते. अशा दु:खद मानसिक स्थितीतही ते रानोवनी फिरुन त्याचा शोध घेत होते, घरची परिस्थिती नसतांनाही त्यावर त्यांचा पैसा खर्च होत होता. तरीही यश काही मिळत नव्हते.

मी त्यांना धीर देत होतो.
हेमंतच्या अशा पद्धतीत जाण्याने माझ्या डोक्यात विचारांचे थैमान सुरु झाले होते. कारण हेमंत हा नैसर्गिक आपत्तीशी लढून इतरांची नि:स्वार्थ भावनेने मदत करीत होता, त्यामुळे तो एक सैनिक नव्हता का? प्रसंगावधान व धाडस दाखवून इतरांची मदत करीत असतांनाच त्याच्यावर काळ ओढवला, म्हणून तो वीरगती किंवा शहिद नाही झाला का?

सिमेवर आपले सैनिक प्राणांची बाजी लावतात.,, शासन त्यांच्या पठिशी असते.. मात्र हेमंत तर साधारण व्यक्ती होता. नैसर्गिक आपत्तीशी लढण्याचं त्याला प्रशिक्षण मिळालं नव्हतं किंवा हे करुन त्याला काही मिळणार होतं असंही नव्हतं. तरीही त्याने जीवाची पर्वा केली नाही. म्हणून त्याचे कार्य उजवे नाही का? होय, माझ्या मते तो वीरगतीला प्राप्त झाला आहे.

असा विचार करीत असतांना मी वर पाहून विधात्याकडे नकळत प्रार्थना करुन गेलो, की “देवा तू मला तुझ्याकडे कधीही बोलव, मात्र नेतांना अशी चार चौघांची मदत मात्र माझ्या हातून घडू दे.

”अपघाताच्या चौथ्या दिवशी आसोदा शिवारात नाल्यातील चिखलात एकरुप झालेला मृतदेह एका शेतक-याच्या निदर्शनास आला. ही बातमी वा-यासारखी पसरुन ओळखीच्या लोकांमुळे तो हेमंतचाच मृतदेह असल्याची ओळखी पटली.

कंपनी व सहकारी मिळून आम्ही त्याच्या कुटुंबाला फक्त २० हजार रुपयांचीच मदत करु शकलो, ही खंत मनाला आहेच.

– आनंद मल्हारा