“शुद्धता, प्रामाणिकता आणि विश्वास आमची व्यवसाय मूल्ये नसून तो आमचा धर्म आहे” हे मनोज ने लिहिलेलं स्लोगन असलेली महावीर जयंतीची जाहिरात २० वर्ष आधी भाईसाहेबांना एके दिवशी दाखविली.. ती त्यांना आवडली आणि तेव्हापासून आम्ही रतनलाल सी. बाफना यांच्याशी जुळलो. भाईसाहेब बोलले “मल्हाराजी, आजसे आप हमारा विज्ञापन का काम संभालो, पुरानी एजन्सी ने काम करना ही बंद किया है”. तेव्हा पासून आम्ही भाई साहेबांशी जुळलो.
कामा निमित्ताने त्यांना नियमित भेटणे होत असे. माझ्या आकलन शक्ती नुसार त्यांना थोडे थोडे समजन्याचं प्रयत्न करू लागलो, कारण म्हणतात ना… बंदर क्या जाने अद्रक का स्वाद. आमचे परस्पर विरोधी स्वभाव गुण, तरीही मैत्री जमली. त्यांच्या रक्तात असलेला व्यवहारी पणा, आणि मी सादा कलाकार. कलाकार तेही होतेच..पण ते कलाकार होते रत्नांचे, मोत्यांचे, अंक गणिताचे. अनुशासन प्रिय, मितभाषी, शब्दाला जागणारे,कला प्रेमी, मिनिटात निर्णय घेण्याची त्यांची क्षमता विलक्षण होती. ते बोलायचे “शब्द देऊ नका, दिला तर तंतोतंत पाळा.” खरं म्हटलं तर त्यांच्या सोबत काम करण्यात खूप मजा यायची.
कोणती जाहिरात त्यांना आवडली की खान्देशच नव्हे तर मध्य प्रदेश,गुजरात आणि राजस्थान येथेही जाहिरात देण्यास ते सांगत कारण तेव्हा लांबून लांबून सुवर्णप्रेमी ग्राहक जळगावला येत असत. कारण जळगाव ला सुवर्ण नगरी म्हणून मान प्राप्त करून देण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. “बीज” जाहिरात संस्थेचे गुप्ते साहेबांनी त्यांच्या साठी खूप छान असे कँपेन भारतात प्रसिद्ध केले होते. त्यात “पद्मभूषण गुलजार” यांच्या लाइनी होत्या.. “यदि आज शहांशहा अकबर होते तो वो मुमताज के लिये गहने जलगाव आर सी से ही खरिदते.”
३१ डिसेंबर जवळ आले की भाई साहेबांना हास्य कवी संमेलनाची ओढ लागे. नवीन वर्षाचे स्वागत हसत हसत करायला हवे …मांसाहार आणि मद्य सेवनाने नव्हे असे त्यांना आतून वाटे.
कार्यक्रमाची आमंत्रण पत्रिका १०००- २००० नाही तर चक्क २५- ३०,००० छापत..पत्रिका घरा घरात पोचवत आणि कार्यक्रमात आलेल्या प्रत्येकाचे मनाने स्वागत करीत असत. आम्हाला ही कल्पक्तेसाठी पूर्ण स्वातंत्र्य असे. छान डेकोरेशन, कल्पक स्टेज साठी आम्हीही जीव लावून नवीन देण्याचा प्रयत्न करीत असू, मग कार्यक्रम गो शाळेत असो की पोलिस ग्राउंड वर की औरंगाबाद मध्ये.
शोरुम साठी व्हिडिओ जाहिरात बनवायची होती, मुंबई हून प्रोफेशनल टीमला बोलावले, पहिल्याच मीटिंग मध्ये जाहिरात फायनल केली. १५ वर्ष आधी ८-९ लाख रुपये त्या साठी खर्च केलेत आणि “हम जानते है सोने की अहमियत को.. इसलिए देते है सर्वोत्तम अलंकार” ही जाहिरात तयार झाली.
मला आठवतेय आमच्या नवीन ऑफिस च्या उदघाटन प्रसंगी आदरणीय सुरेशदादा, मोठे भाऊ, कवि महानोर साहेब यांच्या सोबत भाईसाहेब ही आले होते. त्यांनी त्यांच्या भाषणात विनोद पूर्ण शैलीत आम्हाला टोला लगावला.. बोलले.. “मल्हाराजी खुद का अच्छा ऑफिस तो सस्ते मे बनाते है और हमे डिझाईन के चार – पांच अंकी बडे बडे बील देते हैं.”
भाई साहेब खूप चांगले वक्ता होते. कमी बोलायचे, मुद्देसूद बोलायचे, अभ्यास पूर्ण बोलायचे… पण टाळ्या हमखास मिळवायचे व श्रोत्यांना खूप हसवायचे. एकदा ते आमच्या कल्चरल कार्यक्रमाला आले खास पेंट शर्ट घालून. मंचा वर येऊन त्यांनी मस्त एक विनोदी कविता ऐकवली आणि आम्ही सर्व पोट धरून हसलो.
भाई साहेबांचे कलेक्शन लई भारी. ते जे जे चांगले वाचत, जे जे चांगले पाहत ते ते सर्व डायरीत लिहून ठेवत. नंतर त्याची विषयारूप विभागणी ही करत. आजही त्यांच्या कपाटात त्यांच्या लिहिलेल्या १०-१५ डायऱ्या असतील. त्यांचे अक्षर ही खूप छान रेखीव होते. लिहिताना ते घाई करीत नसत. ते त्यांची लांब सही देखील अगदी आरामाने,अदबीने करीत.
मी ५-६ महिन्या आधी त्यांना कोरोना काळात भेटलो होतो. ते त्यांच्या बेडरूम मध्ये कामात- लिहिण्यात मग्न होते. मी विचारले “क्या लिख रहे हो भाई साहेब?” ते बोलले “मल्हाराजी, साधू संतो को देने के लिये नोट्स बना रहा हुं. मेरे पास आज भी दो साल का काम पेंडींग है..पुरा कर रहा हुं,एन्जॉय कर रहा हुं. व्यापार की चिंता नहीं, बच्चे संभाल रहे हैं.”
गोशाळा त्यांच्या म्हणजे त्यांची आवडती जागा. गोशाळेला “अहिंसा तीर्थ” नाव दिले. ते खूपदा बोलत की मला गाईंना आत्मनिर्भर बनवायचे आहे.पंच गव्या पासून नवे नवे प्रोडक्ट बनवायचे आहे. गाय आत्मनिर्भर झाली की त्यांची हत्या बंद होईल. हे ही सांगत रोज गोशाळेमध्ये लाख रुपये पाठवावे लागतात. मीही मग म्हणायचो… “भाईसाब गोशाला के कारण , आपके वहा रोज घुमने के कारण आपकी उम्र १० साल से बढ गई है”..आणि ते हसायला लागायचे.
भाई साहेबांचे सामाजिक कार्य खूप मोठे. ते व्यवसायाच्या जोडीला सामाजिक कार्याला, समाज सेवेला खूप महत्त्व देत. शाकाहार प्रसार असो की, गोशाळेचे काम, करुणा क्लब असो वा शेतकरी मेळाव्याचे आयोजन ते स्वतः ल झोकून देत. सामाजिक कार्या साठी मी त्यांना अनेक पर्याय, प्रस्ताव देत असे. मला जे गरजेचे वाटायचे ते मी त्यांना सांगत असे. पण ते असेच प्रस्ताव निवडायचे ज्यात गरिमा असेल, प्रतिष्ठा असेल. एकदा मी त्यांना सांगितले की आपण शहरात जागो जागी डस्ट बिन लावू या, शहराला त्याची गरज आहे पण ते बोलले “नही वो अपने व्यवसाय को शोभा नहीं देता”.
त्यांना जर डिझाईन, प्रोजेक्ट आवडले नसेल तर ते कागद त्यांच्या जवळ ठेवून घेत. मी काही दिवसा नंतर त्यांना विचारत ..”भाईसाहब, आपको यदी कूछ पसंद नहीं आता हैं तो साफ क्यो नहीं कहते?” ते सांगत “सामने वाला अपने आप समज जाता है, हम अपने मुह से क्यो बोले?”
भाई साहेबांना आमचा करवंदांचे लोणचं खूप आवडायचं . ते विचारायचे कुठे मिळेल हे लोणचे? मी सांगायचो “नहीं मिलेगा , इसे निलॉनस वाले बनाकर देते है और करोंदे हमारे घर के झाड पर लगते है. पण या लोणच्यासाठी त्यांनी गो शाळेत करोंद्याचे दोन झाड लावून घेतली. आणि हो ते जेवण करताना एकटे एकटे नव्हे तर दोन- तीन जण एका ताटात जेवण करीत. मोठ्या साइज चे ते ताट (थाल)असतं.
आम्ही सर्व मिळून नेहमी त्यांचा वाढदिवस साजरा करायचे. कधी चित्र फित बनवून तर कधी ड्रॉइंग, अनुभव कथन स्पर्धा घेऊन. काही वर्षा आधी एकदा त्यांच्या वाढदिवसाला “कृतज्ञता दिवस” म्हणून साजरा केला. ज्यांनी ज्यांनी भाईसाहेबांना त्यांच्या आयुष्यात विशेष मदत केली त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करणे हे ठरले. भाईसाहेबांनी नावे दिलीत. त्या सर्व व्यक्तींचे होर्डिंग्ज लावून, मानपत्र देऊन त्यांचा कार्यक्रमात यथोचित सन्मान केला. हा त्यांना आवडलेल्या कार्यक्रमा पैकी एक कार्यक्रम होता.
“मल्हार हेल्प फेअर” च्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते..मी त्यांना विनंती केली की आपण आमंत्रित सामाजिक संस्थांना काही मदत राशी ची घोषणा करा , त्यांनी त्याच क्षणी ५ लाखाची घोषणा करून कार्यक्रमाला एक उंची मिळवून दिली.
दोन वर्षा आधी जळगाव मध्ये “जैन ग्रुप” च्या पुढाकाराने जे सी एल २० चे आयोजन करण्यात आले होते व त्या इव्हेंटला प्रायोजकाची गरज होती, क्रिकेट मध्ये इंटरेस्ट नसतानाही केवळ एक चांगले नियोजन आहे, शहरात काही नवीन होत आहे, जैन ग्रुप पुढाकार घेत आहेत म्हणून त्यांनी त्याला स्पॉन्सरशिप साठी मदत राशी दिली व ती स्पर्धा यशस्वी केली.
हे सर्व माझे वैयक्तिक अनुभव आहे पण ते नेहमी चांगल्या प्रोजेक्टला भरभरून मदत करीत. त्यांचे परम मित्र गायकवाड सर सांगत होते “आनंदजी, मी माझ्या नजरेस आलेल्या गरजवंताला आर्थिक मदतीसाठी भाईसाहेबांच्या च्या नावाने अभिमानाने चिठ्ठी द्यायचो आणि भाईसाहेब प्रत्येकाला मदत करीत.. भाईसाहेब गेले …माझं बळ आता कमी झाले रे.”
पण जेव्हा त्यांना मला मदत करायची नसेल तेव्हा ते स्वतः हुन सांगत या वर्षी बिझनेस बरोबर नाही, गो शाळेत खुप खर्च झाले, दोन ठिकाणी खुप डोनेशन द्यावे लागले इ. इ. मग मला समजून घ्यावे लागे की भाई साहेबांना या प्रोजेक्ट मध्ये स्वारस्य नाही, त्यांना मदत द्यायची नाही आहे.
त्यांच्या मदतीचे एक विशेष होते..जळगाव मध्ये कोणालाही तत्काळ मदत हवी असेल तर भाईसाहेब एक असे ठिकाण होते जिथे गरजवंताला कॅश रुपात मदत मिळत असे.
भाईसाहेब अकाउंट मध्ये खूप तरबेज होते. रोज झोपण्याआधी अकाउंट चेक केल्याशिवाय ते झोपत नसत. ते प्रत्येकाला सांगत..जो व्यापारात अकाउंट कडे लक्ष देत नाही, जो काळानुरूप बदलत नाही, जो ग्राहक हित जोपासत नाही तो आज नाही तर उद्या बुडतोच.
ते जेव्हाही भेटायचे.. हमखास विचारायचे कसं चाललंय? बिझनेस कसा आहे? “तनय” कसा आहे? तो तुझे नाव रोशन करेल. मी हासून बोलायचो तो ही ११ फेब्रुवारी लाचजन्मला आला. ते धार्मिक प्रवृत्तीचे.. मला एकदा विचारले “मल्हाराजी जैन स्थानक मध्ये तुम्ही दिसत नाही.. नंतर तेच म्हणाले हो तुझे कामाचं तुझा धर्म आहे माहीत आहे मला.
आज ११ फेब्रुवारी भाई साहेबांचा जयंती दिवस. आज ते आपल्यात नाही पण त्यांच्या आठवणी नेहमी सर्वांना प्रेरणा देत राहतील, निती पूर्ण जीवनाची दिशा दाखवत राहतील..आज भाईसाब नसले तरी त्यांच्या पावला वर पाऊल टाकत त्यांचा वारसा जपणारे आदरणीय नयनतारा बाईजी,पप्पू भाई,सिद्धार्थ भाई,के सी भाईसाब, सुनील भाई, राहुल भाई, अभिषेक भाई संपूर्ण परिवार आपल्या सोबत आहेत याचा अभिमान ही आहे.
*
आनंद मल्हारा
११ फेब्रुवारी २०२१



